धुळे येथील १८४ कोटींच्या रोकड प्रकरणानंतर आमदारांसाठी आचारसंहिता बनवण्यासाठी स्थापन झालेली ‘आचरण समिती अद्याप थंड बस्त्यात आहे. समितीच्या रचनेवर आणि सचिवालयाच्या अजब कारभारावर माजी आमदार अनिल गोटे यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
दोन्ही सभागृहाच्या २९ आमदारांची अंदाज समिती धुळे जिल्हा दौऱ्यावर असताना समिती सदस्यांना देण्यासाठी सरकारी ठेकेदारांकडून जमा केलेल्या १ कोटी ८४ लाख रुपयांची रोकड आढळून आली होती. त्यानंतर विधिमंडळच्या समित्या दौऱ्यावर असताना समिती सदस्यांचे आचरण कसे असावे, याची आचारसंहिता बनवण्यासाठी विधिमंडळाने आचरण समिती स्थापन केली. मात्र स्थापनेनंतर या समितीच्या बैठकीला मुहूर्त मिळत नसल्याने समिती थंड बस्त्यात गेली आहे. मे महिन्यात १८४ कोटीचे रोकड प्रकरण धुळेचे माजी आमदार व ठाकरे गटाचे नेते अनिल गोटे यांनी उघडकीस आणले होते. त्यानंतर विधिमंडळाच्या अब्रुची लक्तरे वेशीवर टांगली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात विशेष पथकाच्या चौकशीची घोषणा केली होती. विधिमंडळ पीठासीन अधिकाऱ्यांनी नीतिमूल्य समिती स्थापण्याचे जाहीर केले होते. याप्रकरणास जबाबदार धरत अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांचे स्वीय सहायक व विधिमंडळात कक्षाधिकारी असलेले किशोर पाटील यांना निलंबीत केलेले आहे.
घटना घडल्यानंतर सात महिन्यांनी विधिमंडळ सचिवालयाने आचरण समिती ४ फेब्रुवारी रोजी स्थापन केली. भाजपचे विधानसभा आमदार चैनसुख संचेती समितीचे अध्यक्ष आहेत. इतर आठ आमदार या समितीचे सदस्य आहेत. सध्या विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे. समिती सदस्य अधिवेशनानिमित्त मुंबईत आहेत. मात्र समितीच्या एकाही बैठकीचे अद्याप कोणतेही नियोजन झालेले नाही. त्यामुळे आचरण समितीविषयी विधिमंडळ सचिवालय गंभीर नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
विधिमंडळाच्या २५ समित्या आहेत. मात्र रिक्त जागा व अनेक कर्मचारी मंत्री कार्यालयात प्रतिनियुक्तीवर असल्यामुळे समित्यांना सचिव नाहीत. त्यामुळे समित्यांचे अहवाल येण्यास तीन ते चार वर्षाचा कालावधी जातो आहे. मागच्या आठवड्यात घाईघाईने कक्षाधिकारी असलेले पाच समिती अध्यक्ष तात्पुरते नियुक्त केले आहेत. या पार्श्वभूमीवर आमदारांच्या आचरण समितीच्या अहवालास मोठा विलंब होण्याची शक्यता आहे.
कोण आहेत समितीमध्ये ?
चैनसुख समिती (अध्यक्ष), सदस्य पुढीलप्रमाणे: सुधीर मुनगंटीवार, विजयकुमार देशमुख, दिपक केसरकर, दिलीप वळसे पाटील, सुनिल प्रभू, अमिन पटेल, अमरीश भाई पटेल, रामराजे निंबाळकर.
समितीवर आक्षेप
अंदाज समिती शासनाचा निधी काटकसरीने खर्च होतो आहे का, याची पाहणी करत असते. धुळे दौऱ्यावर गेलेली समिती २९ आमदारांची होती. त्या अंदाज समितीमध्ये चैनसुख संचेती आणि सुधीर मुनगंटीवार हे भाजपचे दोघे आमदार होते. त्या समितीमधील सदस्यांचा समावेश असलेली आचरण समिती नेमण्याला धुळे रोकड घोटाळा उघडकीस आणणारे माजी आमदार अनिल गोटे यांनी आक्षेप घेतला होता.
Join Gurjarbhoomi Group & get Daily Updates, News & Many more…
https://chat.whatsapp.com/JBcuZPbs8c13mKBrrfFfga

For more details… Contact 9322529232 / 9324483455
